नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना नव्याने कागदपत्रे सादर करण्यासाठी 23 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. दोन्ही गट शिवसेना या पक्षाच्या नावावर आणि धनुष्यबाण या चिन्हावर दावा करत आहेत. त्या दाव्याच्या पुष्टीसाठी आणखी कागदपत्रे सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिली आहे.
निवडणूक आयोगाने 12 नोव्हेंबरला दोन्ही गटांना पत्र पाठवून आणखी कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली. आमच्याकडे सादर केल्या जाणाऱ्या कागदपत्रांची देवघेव परस्परांमध्ये करण्याची सूचनाही आयोगाने दोन्ही गटांना केली. संबंधित मुदतीपर्यंत कुठली कागदपत्रे सादर न झाल्यास दोन्ही गटांकडे नव्याने सांगण्यासारखे काही नसल्याचे मानले जाईल. तसेच, सुनावणीची तारीख निश्चित करण्यासारखी पुढील कार्यवाही केली जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.
शिवसेना आणि पक्षचिन्हावर केल्या जाणाऱ्या दाव्यासंदर्भात निवडणूक आयोगाने मागील महिन्यात अंतरिम निर्णय दिला. आयोगाने दोन्ही गटांना केवळ शिवसेना हे पक्षाचे मूळ नाव आणि पक्षचिन्हाचा वापर करण्यास मनाई केली. आता आयोगाचा अंतिम निर्णय काय असणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.