मुंबई – २०१९ विधानसभा निवडणूकांपूर्वीपासून राज्याच्या राजकारणात सुरु असलेले राजकीय भूकंप थांबण्याचं नाव घेत नाहियेत. विधानसभा निवडणुकांपूर्वी झालेली मेगाभरती, सेना सोबत येत नसल्याचं पाहून फडणवीस-पवार यांनी उरकलेला शपथविधी, शरद पवारांनी अजित पवारांचे मोडलेले बंड, शिवसेनेने भाजपपासून फारकत घेत काँग्रेस, राष्टवादीसोबत केलेली सत्तास्थापना, केंद्रीय यंत्रणांच्या राजकीय नेत्यांवरील धाडी व अटकसत्र, शिंदे गटाने ठाकरेंविरोधात पुकारलेलं बंड असे मोठे हादरे बसले. यानंतर आता आणखी काही मोठ्या राजकीय हादऱ्यांची चाहूल लागली आहे.
यातीलच एक म्हणजे राज ठाकरे व भाजप नेत्यांमधील वाढती जवळीक. मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचंच या भेटीगाठींमधून दिसून येतंय. अशातच आता भाजपचे राजकीय चाणक्य अमित शहा राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं वृत्त असून यामुळे मनसे व भाजपमध्ये नक्की काय शिजतंय याची चर्चा सुरु झाली आहे. ( amit shah to meet raj thackeray )
गणेशोस्तवाच्या निमित्त्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ५ सप्टेंबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ते यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन घेतील. मात्र सुत्रांकरवी मिळालेल्या माहितीनुसार अमित शहा भेट घेणार असलेल्या नेत्यांच्या यादीत आता राज ठाकरे यांचं देखील नाव जोडण्यात आलंय. अर्थात मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहा – ठाकरे भेट होणार असेल तर यामागे नक्कीच काहीतरी मोठं राजकीय गणित जुळून येतंय हे वेगळं सांगायला नको.
राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. यामध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश आहे. आता मंहाराष्ट्र भाजपचे नेते व मनसे नेते अमित शहा – राज ठाकरे यांची भेट घडवून आण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे शिंदे गट सोबत असतानाच राज ठाकरे यांच्या रूपाने ठाकरे ब्रँडला देखील सोबत घेण्याचा विचार भाजप करत असल्याचं बोललं जातंय.
तत्पूर्वी, महाविकास आघाडी सत्तेत असताना राज ठाकरे यांनी शिवसेनेने स्वीकारलेल्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या भूमिकेला जोरदार टार्गेट केलं होत. यासाठी ते पक्षाचा झेंडा व अजेंडा बदलून मैदानात उतरले होते. राज्यात नववा राजककीय समीकरण जुळलवून आणलेल्या शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला होता. मात्र उद्धव ठाकरेंशी फारकत घेत शिंदे गट भाजपसोबत गेल्यानंतर मनसेची पुढील रणनीती काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष होते. अशातच आता मनसे व भाजप जवळ येत असल्याचं दिसतंय. मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये भाजप – मनसे एकत्र आल्यास आधीच शिंदे गटाच्या बंडाने अडचणीत सापडलेल्या उद्धव ठाकरेंच्या अडचणी अधिक वाढण्याची शक्यता आहे. ( amit shah to meet raj thackeray )