कात्रज, दि. 13 (प्रतिनिधी) – पुणे पत्रकार व भैरवी सोशल फाउंडेशन यांच्या वतीने कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय अंतर्गत 150 महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबीर घेण्यात आले. मनपा सहाय्यक आयुक्त डॉ. ज्योती धोत्रे व वैद्यकीय अधिकारी डॉ. केतकी घाडगे यांच्या शिबिराचे उद्घाटन हस्ते करण्यात आले.
स्वच्छ पुणे सुंदर पुणे पर्यायाने स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी वर्षभर आरोग्य विभागातर्फे स्वच्छता कर्मचारी योगदान देतात. कचरा व दुर्गंधीत काम करत परिसर स्वच्छ ठेवतात, त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे सामाजिक कर्तव्य आहे.
आरोग्य सेवकांच्या आरोग्याची काळजी घेणे सामाजिक जबाबदारी मानून डॉ. सुचेता भालेराव व डॉ. सचिन भालेराव यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीर व औषध वाटप उपक्रम राबविला. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक विकास मोरे, मनिषा कोपनर उपस्थित होते. शिबिरात डॉ. नेहा अंबुलगेकर, डॉ. अजयप्रकाश कुलकर्णी, डॉ. प्रियांका बराटे आदींसह मोरया नर्सिंग होम, मोरया पॅथॉलॉजी लॅब यांनी योगदान दिले.