मुंबई – डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य अगोदरच कमी पातळीवर असताना पुन्हा लघु पल्ल्यात रुपया कोसळण्याची शक्यता काही विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. या आठवड्यात फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करणार आहे. त्याचबरोबर भारताची व्यापारी तूट वाढली असल्यामुळे रुपयाचे मूल्य आणखी कमी होऊ शकते आणि एका डॉलरला 82 रुपये देण्याची वेळ येऊ शकते असे या विश्लेषकांचे मत आहे. जागतिक चलन बाजारात होत असलेल्या चर्चेनुसार फेडरल रिझर्व्ह 27 जुलै रोजी व्याजदरात 0.50 ते 0.75 टक्क्यापर्यंत व्याजदर वाढ करणे अपेक्षित आहे.
अशा परिस्थितीमध्ये भारतासह वेगाने विकसित होणाऱ्या देशातून परकीय चलन बाहेर जाऊ शकते. गेल्या आठवड्यात रुपयाचा दर काही काळ 80 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत घसरला होता. रुपयासाठी सध्याची परिस्थिती अतिशय नकारात्मक आहे. मात्र आगामी काळामध्ये जर कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या तर मार्चपर्यंत रुपयाचे मूल्य सावरून 78 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत जाऊ शकते.
इंडिया रेटिंग अँड रिसर्च या संस्थेचे अर्थतज्ञ सुनील कुमार सेन यांनी सांगितले की, एकीकडे अमेरिकेच्या व्याजदरवाढीमुळे डॉलर वधारत असतानाच रशिया – युक्रेन युद्ध रेंगाळले आहे. त्यामुळे भारताला कच्च्या तेलासह इतर वस्तूची आयात महागात पडत असल्यामुळे भारताची व्यापारातील तूट वाढत चालली आहे. या दोन्ही कारणामुळे भारतातील परकीय चलनाचा साठा कमी होत असल्यामुळे रुपयाचा भाव कमी होत आहे.
मात्र ही परिस्थिती दीर्घ पल्ल्यात कायम राहणार नाही. युद्ध संपल्यानंतर कच्चे तेल पुन्हा स्वस्त होईल आणि भारतीय रुपया एखाद्या विशिष्ट पातळीवर स्थिरावेल. नोमुरा या संस्थेने म्हटले आहे की, सप्टेंबरपर्यंत रुपयाचे मूल्य 82 रुपये प्रति डॉलर या पातळीपर्यंत घसरु शकते. एप्रिल -जून या कालावधीमध्ये भारताची व्यापारी तूट 70 राज्य डॉलरपर्यंत वाढली आहे. त्याचा रुपयावर परिणाम होत आहे.
मात्र गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी स्पष्ट केले आहे की, भारताबरोबर इतर देशावरही सध्याच्या परिस्थितीचा परिणाम होत आहेत. भारतावरील परिणाम इतर देशाच्या तुलनेत कमी आहे. त्याचबरोबर भारताकडे प्रचंड परकीय चलन आहे. अशा परिस्थितीमध्ये भारताला फार चिंता करण्याची गरज नाही. तरीही रिझर्व्ह बॅंकेचे आणि अर्थ मंत्रालयाचे रुपयाच्या मुल्याकडे बारीक लक्ष आहे. आवश्यक त्यावेळी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.