पाचगणी – हजारो कोटींची फसवणूक आणि अफरातफर केल्याचा आरोप असलेल्या वाधवान बंधूंचा महाबळेश्वर येथील बंगल्यावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज छापा टाकला. सीबीआयचे अधिकारी स्थानिक पोलिसांच्या ताफ्यासह वाधवान याच्या बंगल्यावर हजर झाले. परदेशी पेंटिंग्ज पोर्ट्रेट सील करून ताब्यात घेण्यात येणार असून या पेंटिंग्ज पोर्ट्रेटची किंमत कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत आहे. वाधवान यांच्या बंगल्यात करोडो रुपयांची परदेशी पेंटिंग्ज, पोर्ट्रेट, झुंबरे असून या आलिशान बंगल्यामध्ये जिम, स्विमिंग पूल, संगमरवरी मंदिर देखील आहे. या वस्तू सील करून ताब्यात घेण्यात येणार आहेत.
त्यांची किंमत कोटवधी रुपयांच्या घरात असल्याचे सांगण्यात येत असून त्या वस्तू कुठून आल्या, कशा आणल्या याची शहानिशा सीबीआयचे अधिकारी करत आहेत. महाबळेश्वर येथे 5 एकर परिसरात वाधवान यांचा बंगला असून पहिल्या लॉकडाऊनमध्ये वाधवान बंधूंनी तत्कालिन प्रधान सचिवांचे विशेष पत्र घेऊन महाबळेश्वर येथे प्रवेश केला होता. तेव्हापासून वाधवान बंधू ईडीच्या ताब्यात आहेत. करोना काळात महाबळेश्वरात वाधवान बंधूनी केलेला प्रवेश राज्यभर गाजला होता. त्यानंतर राज्याच्या राजकारणातही आरोप- प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या होत्या. सरकारवर भाजपकडून त्यावेळी अनेक आरोप केले होते.
कोण आहेत वाधवान बंधू?
“दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड’चे (डीएचएफएल) संस्थापक कपिल आणि धीरज वाधवान बंधूंचा अंडरवर्ल्ड डॉन इक्बाल मिर्चीशी संबंध आणि “येस बॅंके’कडून घेतलेले कर्ज थकित झाल्याप्रकरणी ईडीकडून मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत तपास सुरु केला. मिर्ची प्रकरणातही यांचा सहभाग असल्याचा संशय आहे. तसेच येस बॅंक प्रकरणी तपास अद्याप सुरु असतानाच वाधवान बंधूंनी मुंबईबाहेर पळ काढल्याने राज्यात वातावरण ढवळले होते.