राजगुरूनगर ( रामचंद्र सोनवणे): रेटवडी (ता.खेड ) येथे विजेचा शॉक लागुन २७ वर्षीय युवकाचा जागीच मुत्यु झाला आहे. योगेश शामराव देशमुख ( रा. वरची ठाकरवाडी, रेटवडी,ता.खेड ) असे मूत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री ९ वाजता घडली.
याबाबतची माहिती अशी की, रेटवडी गावाची वरची ठाकरवाडी येथे नवीन घरात टिव्ही बसवत होता. टिव्हीला वीजपुरवठ्याची वायर चेक करत असताना त्याला जोरदार वीजेचा शॉक बसला. त्यामुळे तो जागीच कोसळला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.
होलेवाडी येथे एका खाजगी कंपनीत योगेश काम करीत होता. योगेशच्या मागे पत्नी, दोन लहान मुले, आईवडील असा परिवार आहे. या घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली. या घटनेची खेड पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद झाली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार सचिन गिलबिले करीत आहे.