पुणे – ख्यातनाम चित्रकार रवी परांजपे (वय 87) यांचे शनिवारी निधन झाले. भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रात त्यांनी काम केले.
मेंदूमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे परांजपे यांना 30 मे रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वयोमानामुळे त्यांची प्रकृती उपचारांना पुरेसा प्रतिसाद देत नव्हती. शनिवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. परांजपे यांचे पार्थिव दुपारी मॉडेल कॉलनी येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते.
वैकुंठ स्मशानभूमी येथे सायंकाळी परांजपे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले होते. त्यांचे “ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करून देणारे “शिखरे रंग-रेषांची’ हे पुस्तक गाजले.
“नीलधवल ध्वजाखाली’ हे लेखसंग्रहावर आधारित पुस्तक प्रकाशित झाले आहे. परांजपे यांना “कम्युनिकेशन आर्टस गिल्ड’चा (कॅग) “हॉल ऑफ फेम’ हा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांच्या “द ग्रीन एकोज’ या निसर्गचित्राला 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. दयावती मोदी प्रतिष्ठानतर्फे दयावती मोदी हा कला क्षेत्रातील पुरस्कार लाभला होता. तसेच “ब्रश मायलेज’ या पुस्तकासाठी भैरूरतन दमाणी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तर, “दी बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेच्या जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा सन्मान झाला होता.
ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या निधनाने भारतीय चित्रकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख अधिक ठळक करणारा मनस्वी कलाकार हरपला आहे. चित्रकलेबरोबरच वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात अशा अनेक क्षेत्रात त्यांनी केलेले काम कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने भारतीय कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
– अजित पवार, उपमुख्यमंत्री