नवी दिल्ली, वृत्तसंस्था : प्रेषित मुहम्मद यांच्यावरील टिप्पणीचा मुद्दा सातत्याने जोर धरत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांना तसेच भाजपमधून निलंबित करण्यात आलेल्या नुपूर शर्मा यांना प्रक्षोभक विधाने करणे महागात पडले आहे. ओवेसी यांच्या या वक्तव्याबाबत दिल्ली पोलिसांच्या IFSO (इंटेलिजन्स फ्यूजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्स) टीमने त्यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे.
या एफआयआरमध्ये स्वामी यती नरसिंहानंद यांचेही नाव आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावरील वक्तव्याचा अनेक आखाती देशांनी निषेध केला होता, त्यानंतर आता केंद्र सरकार प्रक्षोभक वक्तव्यांवरून ऍक्शन मोड वर दिसत आहे.
नुपूर शर्मा यांच्यासह ९ जणांवर FIR
सोशल मीडियावर खोटी माहिती पसरविणे आणि प्रक्षोभक विधाने करणाऱ्यांवर दिल्ली पोलिस आता कडक कारवाई करत आहेत. नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल, मौलाना मुफ्ती नदीम, अब्दुर रहमान, शादाब चौहान, सबा नक्वी, गुलजार अन्सारी, अनिल कुमार मीना आणि पूजा शकुन यांची नावे या अंतर्गत नोंदवलेल्या एफआयआरमध्ये समाविष्ट आहेत.