सहायक धर्मादाय आयुक्त तिडके : पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे निरोप समारंभ
पुणे – “न्यायाधीश होणं ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्याद्वारे जनतेची सेवा करता येते. कोणाही अधिकाऱ्याने खुर्चीवर बसलो म्हणून मनमानी करू नये. तर, त्याला प्राप्त अधिकार हे जलद व नि:स्पृहपणे न्याय करण्यासाठी दिलेले आहेत हे कायम स्मरणात असू द्यावे,’ असे मत सहायक धर्मादाय आयुक्त अमरदीप तिडके यांनी व्यक्त केले.
तिडके यांची पुण्यातून मालवणला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी म्हणून नुकतीच बदली झाली आहे. येथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे आयोजित निरोप समारंभात ते बोलत होते. यावेळी बोलताना तिडके म्हणाले की, त्यांचा पुण्यातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त म्हणून तीन वर्षांचा कालावधी हा संस्मरणीय होता.
विद्वत्त प्रचुर वकिलांमुळे उत्तमोत्तम युक्तीवाद होऊन कायदाचा मतितार्थ योग्यरितीने मांडला जायचा. संघटनेतील सर्वांत ज्येष्ठ वकील ऍड. रंगनाथ ताठे यांचे हस्ते संघटनेच्या प्रथेनुसार मानाची वस्त्रप्रावरणे देऊन तिडके यांचा गौरव करण्यात आला. सौ. करुणा तिडके यांचा ऍड. गायत्री पंडित यांचे हस्ते साडी व ओटी देऊन पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना करताना अध्यक्ष ऍड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले की, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या या रौप्यमहोत्सवी वर्षांच्या गौरवपूर्ण वाटचालीत वकील व अधिकारी यामध्ये सौहार्दपूर्ण संबंध राखण्यावर भर दिला जातो. ज्यामुळे पक्षकार संस्थांना जलद निर्णयांचा लाभ व्हावा असा प्रयत्न असतो.
याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. दिलीप हांडे, ऍड. पराग एरंडे, ऍड. सतिश पिंगळे व खजिनदार ऍड. रजनी उकरंडे यांनी मनोगते व्यक्त केली. सचिव ऍड. सुनिल मोरे, ऍड. ओजस देवळणकर आणि ऍड. मुकेश परदेशी यांनी कार्ययक्रमाचे संयोजन केले. ऍड. रोहिणी पवार यांनी
सूत्रसंचलन केले. तर उपाध्यक्ष ऍड. मोहन फडणीस यांनी आभार मानले.