पिंपरी – वाहन चालकांवर ऑनलाइन केसेस करूनही काही उपयोग होत नाही. त्यामुळे यंदाच्यावर्षी वाहन चालकांवर केसेस करण्यापेक्षा वाहतुकीला शिस्त लावण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाहतूक पोलिसांकडून यंदा तब्बल 86 हजार 508 केसेस कमी झाल्या आहेत.
वाहतूक पोलीस चौकात दिसल्यास सहसा कोणी वाहतुकीच्या नियमांचा भंग करीत नाही. मात्र पोलीस चौकातील एखाद्या कोपऱ्यात दंडात्मक कारवाई करण्यात व्यस्त असल्यास त्याचा गैरफायदा घेत अनेक वाहन चालक नियमांचा भंग करतात. चालकांशी वाद नको म्हणून अनेकदा पोलीस वाहन चालकांना ऑनलाइन दंड टाकतात. मात्र ऑनलाइन दंड वसुलीचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी लोक अदालत घेतली जाते. तसेच वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी दंड वसूलीसाठी विशेष मोहीमही राबविली जाते. तरीदेखील आजच्या तारखेला दंडाची रक्कम कोटींच्या घरात आहे.
दंडात्मक कारवाई करूनही वाहन चालकांमध्ये काहीच फरक पडत नसल्याने दंडात्मक कारवाई कमी करा, मात्र शहरात कोठेही वाहतूक कोंडी होता कामा नये, असे आदेश वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. याचाच परिणाम आता वाहतूक पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कसेसेवर होत आहे.
गेल्यावर्षी 1 जानेवारी ते 30 एप्रिल 2021 या कालावधीतमध्ये वाहतूक पोलिसांनी एकूण तीन लाख 10 हजार 316 केसेस वाहन चालकांवर केल्या होत्या. यंदाच्या वर्षी 2022 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत दोन लाख 23 हजार 808 केसेस वाहन चालकांवर केल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 86 हजार 508 केसेस कमी आहेत. पोलिसांच्या दंडात्मक कारवाया कमी झाल्याने वाहन चालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.