शिर्डी -राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या साई संस्थांनच्या माध्यमातून भाविकांमध्ये एक विश्वासाचं नातं जोपासण्यामध्ये प्रशासन नेहमी अग्रक्रमी आहे. अशातच साई मंदिराचा कळस, द्वारकामाई, समाधी मंदिराचा गाभारा, गुरुस्थान मंदिर, दत्त मंदिर, साईबांचे सिंहासन, तसेच दररोजच्या पूजेमधील भांडी यासह अनेक वस्तू सोन्याच्या आहेत. शेकडो किलो असणारे हे सर्व सोने वेगवेगळ्या भाविकांनी श्रद्धेपोटी साईंच्या चरणी देणगी स्वरूपात दिलेलं आहे. मंगळवारी हैद्राबाद येथील साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांनी दोन कोटी रुपयांचे तब्बल चार किलो सोने साई समाधीच्या चौथऱ्यासाठी अर्पण केले.
हे सोने साई संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते भाविकांनी साईचरणी अर्पण करीत आपल्या भक्तीचा आणि श्रद्धेचा एक अनोखा अनुभव सर्वांनी अनुभवला. साईबाबांना एक हाताने केलेले दान साईबाबा दहा हाताने परत करतात. याच श्रद्धेपोटी बाबांच्या झोळीत हिरे, माणिक, मोती, चांदी, यासह लाखो करोडो रुपये देणगी स्वरुपात देणारे दानशूर आजही शिर्डीच्या साई मंदिरात भरभरून देणगी देत आहे. याच देणगीतून आलेल्या पैशांचा उपयोग शिर्डीसह पंचक्रोशीतील विकास कामासाठी केला जातो तर राज्यातील गोरगरीब नागरिकांना हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार तसेच शस्रक्रिया, औषधांसाठी केला जातो.
याच बरोबर शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणासाठी करोडो रुपयांची मदत, आंतरराष्ट्रीय साईबाबा एअरपोर्ट, याबरोबर आपत्कालीन वेळी शासनाला मदत आणि राज्यातील अनेक हॉस्पिटला करोडो रुपयांची मदत साई संस्थानने आजवर केली आहे.
चार किलो सोने देणगी देणारे हैद्राबाद येथील साईभक्त पार्थसार्थ रेड्डी यांचा साई संस्थांनच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थांनचे विश्वस्त अविनाश दंडवते, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपकार्यकारी अधिकारी राहुल जाधव आणि मंदिर प्रमुख रमेश चौधरी उपस्थित होते.
दानशूर भाविकांना शिर्डी आणि परिसरात विकास कामांसाठी तसेच हॉस्पिटल, शैक्षणिक संकुलातील अद्ययावत सुविधेसाठी चर्चा करून माहिती दिली तर शिर्डी शहर एक अद्ययावत शहर म्हणून नावारूपाला येण्यास नक्कीच मदत होईल.
– अभय शेळके पाटील, माजी उपनगराध्यक्ष शिर्डी.