न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एका सुपरमार्केटमध्ये भीषण गोळीबार झाला असून, त्यात १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक लोक जखमी झाले. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. ‘टॉप्स फ्रेंडली’ सूपरमार्केटमध्ये झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
गव्हर्नर कॅथी होचुल यांनी ट्विट करत म्हटले आहे की, बफेलो येथील किराणा दुकानातील घटनेबाबत अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून पुढील तपास आहे. बफेलो येथील पोलीस आयुक्त जोसेफ ग्रामाग्लिया यांनी सांगितले की, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याने हेल्मेट घातले होते.
BREAKING: The death toll has risen to 10 in a mass shooting at a Buffalo, N.Y., supermarket, law enforcement officials told The Associated Press. https://t.co/N08wAwjwNc
— The Associated Press (@AP) May 14, 2022
पोलिसांनी गोळीबारात 10 जणांचा मृत्यू आणि तीन जण जखमी झाल्याचे सांगितले आहे. मार्केटमध्ये एक निवृत्त पोलीस अधिकारी सेक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते. पोलिसांनी घटनेबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने निवृत्त पोलीस अधिकारी असलेल्या सेक्युरिटी गार्डच्या मानेवर बंदुक धरली होती. मात्र, पोलिसांनी आणि त्याच्यामध्ये झालेल्या संभाषणानंतर आरोपीने आत्मसमर्पण केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
एफबीआयच्या पथकाकडून संशयिताची चौकशी सुरु आहे. पोलीस आणि तपास पथकाला संशय आहे की गोळीबार करणाऱ्या व्यक्तीने त्याच्या हेल्मेटवर बसवलेल्या कॅमेऱ्याद्वारे संपूर्ण घटना लाइव्ह-स्ट्रीम केली आहे. सध्या गोळीबाराच्या समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये आरोपी पार्किंगमध्ये कारच्या पुढच्या सीटवर रायफल धरुन बसलेला दिसत आहे. गाडीतून उतरताच त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला. व्हिडीओमध्ये आरोपी सुपरमार्केटमध्ये शिरताना दिसत आहे. आरोपी मार्केटमध्ये आत शिरताच अनेक लोकांना अंदाधूंद गोळीबार करण्यास सुरुवात करतो.