नवी दिल्ली – रॉयल फिलिप्स ही नेदर्लंडची कंपनी भारतात सक्रिय असून कंपनी संशोधन आणि विकासापासून उत्पादनापर्यंत मेक इन इंडियावर भर देत असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॅनियल मेझॉन यांनी सांगितले. कंपनीचे पुण्यात उत्पादन केंद्र असून याठिकाणी संशोधन आणि विकास केंद्र विकसित करण्यात आले आहे. त्यासाठी दहा एकर जागा मिळविण्यात आली आहे.
पुण्यातील उत्पादन केंद्रातून तयार झालेली आरोग्यविषयक उपकरणे भारतीय बाजारपेठेला पुरविण्याबरोबरच जगातील 100 देशांना पुरविली जातात. त्यामुळे निर्यात वाढून भारतात परकीय चलन येण्यास मदत होते. पुण्यातील फिलिप्स हेल्थकेअर इनोव्हेशन सेंटरचे प्रमुख पीयूष कौशिक म्हणाले, मॅन्युफॅक्चुरिंग व इनोव्हेशन सेंटरमुळे आमच्या क्षमतेमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आम्ही कडक जागतिक दर्जाच्या मानकांची पूर्तता करतो आणि भारतामध्ये असलेल्या संपन्न तंत्रज्ञान कौशल्याचा उत्पादकता वाढविण्यासाठी उपयोग करतो.