मुंबई – रुपया घसरल्यामुळे आयातीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे मेअखेरीस बहुतांश इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या किमती वाढणार आहेत. त्यामध्ये टीव्ही, वाशिंग मशीन, फ्रीजचा समावेश आहे. या वस्तूंच्या किमती अगोदरच वाढल्या होत्या. आता त्या आणखी पुन्हा तीन ते पाच टक्क्यांनी वाढणार आहेत.
भारतातील या वस्तूच्या उत्पादकांना काही सुटे भाग आयात करावे लागतात. रुपयाचे मूल्य घसरल्याने या वस्तूच्या आयातीसाठी अधिक रुपये मोजावे लागतात. दरम्यानच्या काळामध्ये चीनमधील शांघाय या सर्वात मोठ्या शहरांमध्ये कडक लॉक डाऊन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या सुट्या भागाचा साठा बंदरावर अडकला आहे. त्यामुळे उपकरणांन निर्मात्याची सुट्या भागांची इन्व्हेंटरी घसरली आहे. अशा परिस्थितीमध्ये हे उत्पादक विविध वस्तूंच्या किमतीत वाढ करणार आहेत.
अगोदरच्या सुट्या भागाची टंचाई निर्माण झाली असतानाच रुपया घसरल्याने त्यात आणखी भर पडली असल्याचे कंजूमर इलेक्ट्रॉनिक्स अँड अप्लायन्सेस मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन या संघटनेने म्हटले आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या नफ्यावर अगोदरच दबाव आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नफ्यांची पातळी किमान पातळीवर ठेवण्यासाठी आम्हाला तीन ते पाच टक्के दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही असे या संघटनेचे अध्यक्ष एरिक ब्रॅगांझा यांनी सांगितले.
काही एअर कंडिशनर निर्मात्यांनी या अगोदर आज आपल्या उत्पादनाच्या दरात वाढ केली आहे. उरलेले उत्पादक लवकराच वाढ करण्याची शक्यता आहे. मात्र जर दोन आठवड्याच्या काळामध्ये रुपयाचा दर वाढवून 75 रुपये प्रति डॉलर या पातळीवर स्थिरावला तर आम्ही दरवाढ टाळण्याच्या शक्यतेवर विचार करू शकतो.
पॅनासोनीक कंपनीने म्हटले आहे की, अगोदर आम्ही याच कारणामुळे जानेवारीमध्ये दरवाढ केली होती. त्यामुळे आता दरवाढ टाळण्याचा प्रयत्न करीत आहोत. मात्र आयातीचा खर्च जर वाढत गेला तर आम्हाला दरवाढ करण्याशिवाय पर्याय नाही. दरम्यान याच कारणामुळे आयातीवर अवलंबून असलेल्या इतर क्षेत्रातील उत्पादनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रशिया- युक्रेन युद्ध संपुष्टात येत नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी आहे.