लोणावळा – गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी दीड लाख रुपये लाच स्वीकारताना लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाकडून रंगेहाथ पकडण्यात आले. याशिवाय या प्रकरणात लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आणि अन्य एक खाजगी व्यक्ती अशा एकूण तीन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमधील एका गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी तक्रारदार याच्याकडे संबंधितांकडून दोन लाखाची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती ठरलेली दीड लाख रुपयांची रक्कम घेण्यासाठी गेलेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान (वय 52) याला तसेच खाजगी व्यक्ती यासीन कासम शेख (वय 58) याला अटक करण्यात आली आहे. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कुतुबुद्दीन गुलाब खान याला या कामासाठी प्रोत्साहित करण्याच्या आरोपाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे (वय 50) यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
या कारवाईमध्ये लाचलुचपत विभागाच्या पोलिस उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मुश्ताक खान, पो. कॉ. अंकुश आंबेकर, सौरभ महाशब्दे, पूजा डेरे, दामोदर जाधव, चंद्रकांत कदम यांनी सहभाग घेतला.