पुणे (संजय कडू) – सांस्कृतिक पुणे, सायकलींचे पुणे अशी आभूषणे मिरवताना आता “बालगुन्हेगारांचेही पुणे’ असे म्हणण्याची वेळ आली आहे. शहरात खून आणि खुनाच्या प्रयत्नाच्या गंभीर गुन्ह्यांत बालगुन्हेगार सर्रास सहभागी असल्याचे दिसते. यातही भाईगिरीसाठी आणि वर्चस्वासाठी खुनाच्या प्रयत्नांचे गुन्हे केलेले बालगुन्हेगार मोठ्या प्रमाणात आहेत. शहरात सन 2020 ते 2022 या अडीच वर्षांत कालावधीत बालगुन्हेगारांकडून खुनाचे प्रयत्न झाल्याचे तब्बल 98 गुन्हे घडले. यामध्ये 175 बालगुन्हेगारांचा समावेश होता. ही आकडेवारी धक्कादायकच आहे.
पुणे शहराचा विस्तार 90 च्या दशकापासून रुंदावत गेला. यामुळे रोजगार आणि अन्य उद्योगांसाठी पुण्यात अनेक कुटुंबे स्थायिक झाली. पर्यायाने वस्त्या वाढत गेल्या. दाटीवाडीने वसलेल्या वस्त्यांमध्ये अवैध्य धंदे आणि गुन्हेगारीचे साम्राज्य वाढू लागले. या सराईतांचे अनुकरण हळूहळू वस्त्यांमधील अल्पवयीन मुले करू लागली. आई-वडील रोजगाराच्या शोधार्थ घराबाहेर असल्याने अल्पवयीन मुलांवर लक्ष ठेवायला कोणी नसल्याचा परिणाम बाल गुन्हेगारीच्या समस्येत रूपांतरित झाला. स्वप्नं पाहण्याच्या वयात ही अल्पवयीन मुलं दरोडा, बलात्कार, खून, चेन स्नॅचिंग, चोरी, मोटार वाहन चोरी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी होताना दिसत आहेत.
वस्त्यांमध्ये प्रस्थ वाढवण्याचे प्रयत्न
अल्पवयीन मुलांना गुन्ह्यात पोलिसांनी पकडले तर मुलांना शिक्षा होत नाही. त्यांना सुधारगृहात ठेवले जाते. तेथे सराईत अल्पवयीन गुन्हेगारांची संगत लाभल्यावर त्यांची गुन्हेगारी कृत्ये वाढतच जातात. शहरात सध्या बड्या टोळ्यांचे म्होरके मोक्का व इतर गुन्ह्यात आत आहेत. याचा फायदा बालगुन्हेगारांना झाला. ते वस्त्यांमध्ये आपले प्रस्थ वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. तर काही टोळ्या अल्पवयीन गुन्हेगारांना हाताशी धरून त्यांचे प्रस्थ कायम टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.
गुन्ह्यांचे स्वरूप गंभीर
बालगुन्हेगार म्हणजे आजवर मौजमजेसाठी वाहन चोरी आणि छोट्या मोठ्या चोऱ्या करणारे एवढेच समाजाला माहिती होते. मात्र, मागील काही वर्षांत खून, बलात्कार, खुनाचा प्रयत्न, दहशत आणि जाळपोळीच्या गुन्ह्यातही बालगुन्हेगार सहभागी असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलिसांपुढे आव्हान आहे.
अटकेनंतर वाढते क्रेझ
विशेष म्हणजे अल्पवयीन मुले अगदी सराईत गुन्हेगाराप्रमाणे गुन्हे करू लागली ओहेत. त्यांना कायद्याचा धाक वाटत नाही. या उलट त्यांना अटक झाल्यास त्यांची “क्रेझ’ वस्तीत आणखी वाढत जाते. ते आपल्यावरील गुन्हे अभिमानाने मिरवताना दिसतात.
बालस्नेही केंद्र आणि भरोसा सेलचा उपयोग गुन्हेगारीची सवय लागलेल्या मुलांना सुधारण्यासाठी वेगळी यंत्रणा नाही. मात्र, काही सामाजिक संघटना आणि पोलीस पुढाकार घेत आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात बालस्नेही केंद्र उभारण्यात येत आहे. तसेच भरोसा सेलच्या माध्यमातूनही त्यांचे समुपदेशन केले जाते.