खासदार सुप्रिया सुळे, राहुल कुल यांचे प्रयत्न फलदायी
सात हजार रेल्वे प्रवाशांना दिलासा : दौंड प्रवासी संघाच्या प्रयत्नाना यश
पहाटे साडेचार ते रात्री सव्वादहापर्यंत गाड्या धावणार
वरवंड – रेल्वे प्रशासन, महाराष्ट्र राज्य शासन, खासदार सुप्रिया सुळे, पुणे आणि सोलापूर विभाग, दौंड-पुणे- दौंड प्रवासी संघाच्या पाठपुराव्याने दौंड- बारामती- पुणे मेमू सेवा दोन वर्षांनंतर रुळावर आली आहे. त्यामुळे दौंड, हवेली, बारामती तालुक्यातील सुमारे सात हजार प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून करोनाच्या कहरात ही सेवा ठप्प झाली होती. त्यानंतर पहिला लॉकडाऊन शिथिल केल्यानंतरही डेमू सुरू झाली नव्हती. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होती. तरीही सेवा सुरू झाली नाही. त्यानंतर अवघ्या पाच महिन्यांतच दुसरी लाट येऊन आदळली. त्याची भर पडल्याने पुन्हा सेवा सुरू होण्यास ब्रेक मिळाला. दुसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाची मोहिम राबविली होती. त्यावेळी रेल्वे कर्मचारी, दोन लस घेतलेले प्रवासी यांना सवलत दिली होती. त्यावेळी दररोज पुण्यात येणारे सात हजार प्रवासी खासगी गाड्यांचा आधार घेत येत होते. यात हजारो प्रवाशांना आर्थिक भुर्दंड बसत होता. तरीही रेल्वे प्रशासन ढिम्म होते.
खासदार सुप्रिया सुळे, आमदार राहुल कुल, दौंड प्रवासी संघ यासाठी प्रयत्नशील होता. अखेर रेल्वे प्रशासनाने रविवारी (दि.3) डेमू, मेमूसाठी हिरवा कंदील दाखवत 11 एप्रिलपासून पूर्ववत करण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पहाटे साडेचारपासून ते रात्री सव्वा दहापर्यंत या गाड्या धावणार आहेत. त्यामुळे पुणे-दौंड-बारामती मार्गावर डेमू आणि मेमूच्या गाड्या प्रवाशांच्या अर्थकारणाला दिशा देणाऱ्या ठरल्या आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून ठप्प झालेली मेमू आणि डेमू पूर्ण क्षमतेने रुळावर येणार आहे. रेल्वे प्रवाशांसाठी राज्य शासन, खासदार सुप्रिया सुळे, रेल्वे प्रशासन, आमदार राहुल कुल, दौंड रेल्वे प्रवासी संघाच्या पाठपुराव्याने ही सेवा पूर्ववत होत आहे. त्यामुळे दौंड, हवेली तालुक्यातील प्रवाशांना आता गैरसोय दूर झाली आहे.
– विकास देशपांडे, सचिव, दौंड- पुणे रेल्वे प्रवासी संघ.