कोंढवा – उंड्री येथील इंग्रजी माध्यमाच्या युरो शाळेत पहिल्याच दिवशी आज (दि.4) पालकांना धक्काबुक्की करण्यात आली. शालेय शुल्काबाबत ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण उपसंचालकांकडे तक्रारी केल्या होत्या, त्या विद्यार्थ्यांचे टीसी (दाखले) शाळेने मेलद्वारे पाठवून विद्यार्थ्यांना थेट प्रवेश नाकारला. असे पालक शाळेत प्रवेशासाठी गेल्यानंतर त्यांना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केली. पालकांना बराच वेळ गेटबाहेर थांबवून ठेवण्यात आले. यावेळी शाळेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बिबवेवाडी क्लाइन मेमोरियल शाळेत काही दिवसांपूर्वीच पालकांना धक्काबुक्की झाली होती. त्यानंतर हा मुद्दा अधिवेशनातही गाजला होता. यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शाळेत बाऊन्सर न ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आता शिक्षणमंत्र्यांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
मयंक चौधरी (इयत्ता तिसरी) म्हणाला की, माझ्या आईने मला शाळेत सोडले. मला मिसने शाळेत घेतले. त्यानंतर शिक्षकांनी माझे नाव विचारले आणि दोन दिवसांपूर्वी टीसी पाठविले आहे, त्यांनी पालकांना बोलाविण्यास सांगितले. मी आईला बोलावले आणि आईने व्हीडिओ काढायला सुरुवात करताच सिक्युरिटी आणि बाऊन्सरने धक्काबुक्की करीत बाहेर काढले. दरम्यान, युरो शाळा प्रशासनाशी वारंवार संपर्क साधण्यासाठी प्रवेशद्वारावरील सुरक्षा रक्षकांमार्फत निरोप दिला. मात्र, प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही अथवा प्रतिक्रिया दिली गेली नाही.
चौकशी अहवाल आल्यावर संबंधित शाळेवर कारवाई
पुणे, – उंड्री येथील युरो शाळेत सुरक्षारक्षक व पालक यांच्यात वादावादी झाल्याने गोंधळ उडाला होता. या प्रकरणाचा सखोल चौकशी अहवाल आल्यानंतर शाळेवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे यांनी दिली आहे.
पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक औदुंबर उकिरडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संध्या गायकवाड यांनी शाळेला भेट देत शाळा प्रशासन व पालकांची बैठक घेतली. यात उर्वरित 50 विद्यार्थ्यांना शाळेत पुन्हा प्रवेश द्यावा. विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी दोन महिन्यांची मुदत द्यावी, असे आदेश शाळेला बजाविले असल्याची माहिती उकिरडे यांनी दिली.
सुरक्षारक्षकांकडून पालकांना कोणतीही धक्काबुक्की झालेली नाही. केवळ वादावादी झाली आहे. शाळेत घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यांचा अहवाल आल्यावर पुढील कारवाईबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, असे उकिरडे यांनी सांगितले.
सोशल मीडियावर बाउन्सरने धक्काबुक्की केल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शाळेत सुरक्षारक्षक आहेत, बाउन्सर नाहीत. तसेच, अद्यापही कोणत्याच पालकांनी पोलिसांकडे तक्रार दिलेली नाही.
– सरदार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोंढवा पोलीस ठाणे