प्रशासकांची पॉवर – यांत्रिकी रस्ते सफाईसाठी 362 कोटींच्या खर्चाला मान्यता
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेवर प्रशासन लागले आहे. प्रशासक म्हणून आयुक्त राजेश पाटील काम पाहत आहे. मंगळवारी (दि. 29) प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. या पहिल्याच सभेत प्रशासक पाटील यांच्या पॉवरची कल्पना शहरवासियांना आली. तब्बल तीन वर्षांपासून रखडलेल्या यांत्रिकी रस्ते सफाईच्या विषयाला सभेत मंजुरी दिली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रूंदीचे रस्ते यांत्रिक पद्धतीने (रोड स्वीपर मशिन) साफसफाईसाठी शहराचे दक्षिण व उत्तर असे दोन भाग करण्यात आले आहेत. दोन भागांतील 7 वर्षे कालावधीसाठी तब्बल 362 कोटी 4 लाख खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा विषय गेल्या तीन वर्षांपासून वारंवार तहकूब करण्यात येत होता. तसेच अनेकदा हा विषय सभेमध्ये दफ्तरी दाखल करण्यात आला होता. मात्र आता रस्ते सफाईच्या या विषयाला प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.
यांत्रिक पद्धतीने रस्ते सफाई कामांसाठी पूर्वी शहराचे 8 भाग, नंतर 4 आणि आता दोन भाग करण्यात आले. या कामासाठी टंडन अर्बन सोल्यूशन ही सल्लागार एजन्सी नियुक्त करण्यास स्थायी समितीने 11 सप्टेंबर 2018 ला मंजुरी दिली होती. त्या एजन्सीने या कामांचा प्रस्ताव तयार केला आहे. या प्रकरणी विरोधकांनी अनेक आरोप केले. त्यांची दखल घेऊन तांत्रिक कारण पुढे करीत तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय रद्द केला होता. त्यानंतरही आरोग्य विभागाने तो प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेसभोर ठेवला होता. तब्बल दोन वेळा हा विषय दप्तरी दाखल करण्यात आला.
दप्तरी दाखल असताना अचानक उपसूचना देऊन तो विषय सप्टेंबर 2021 मध्ये ऑनलाइन सभेत दाखल करून घेण्यात आला. उपसूचनेत चारऐवजी दोन भागांना मंजुरी देण्यात आली. मात्र, नव्याने सुधारित प्रस्ताव पुन्हा तहकूब करण्यात आला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्या विषयावरून गोंधळ होऊ नये म्हणून तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हा विषय तहकूब केला होता. मात्र, प्रशासकाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत या विषयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल तीन वर्ष रखडलेला विषय प्रशासकाच्या कालावधीत मार्गी लागला आहे.
एकूण 670.15 किलोमीटरचे रस्ते
शहरातील 18 मीटरपेक्षा अधिक रूंदीचे रस्ते रोड स्वीपर मशिनने स्वच्छ केले जाणार आहेत. शहरात असे एकूण 670.15 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. दक्षिण भागासाठी 331 किलोमीटर व उत्तर भागासाठी 339.15 किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. दक्षिण व उत्तर भागासाठी रस्ते सफाईचे अजवड 4, मध्यम 34, पिकर 8 असे प्रत्येकी एकूण 16 वाहने आहेत. कॉम्पेक्टर प्रत्येकी 3, पाण्याचा 10 हजार लिटरचे प्रत्येकी 2 टॅकर, प्रत्येकी 150 सफाई कामगार, प्रत्येकी 16 चालक, प्रत्येकी 20 ऑपरेटर, प्रत्येकी 5 मजूर असणार आहे. एका भागासाठी एकूण 191 कर्मचारी असणार आहेत.