मुंबई – रशिया- युक्रेन त्यामुळे निर्माण झालेली अनिश्चित परिस्थिती कायम आहे त्यामुळे गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा चालूच असून त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजार निर्देशांक खात घसरण नोंदली गेली.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 233 अंकांनी कमी होऊन 57,362 अंकांवर बंद झाला. विस्तारित पाया असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 69 अंकांनी म्हणजे 0.40 टक्क्यांनी कमी होऊन 17,153 अंकांवर बंद झाला.
जुलियस बिअर या संस्थेचे कार्यकारी संचालक मिलिंद मूछला यांनी सांगितले की जागतिक बाजारातून उलट-सुलट संदेश येत आहेत. कच्च्या तेलाचे दर कमी जास्त होत आहेत. त्याचबरोबर फेडरल रिझर्व भांडवल सुलभता कमी करण्याबद्दल भाष्य करीत आहे. भारताबरोबरच जागतिक पातळीवर चलनवाढीचा धोका निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढत चालला आहे. त्यामुळे देशातील गुंतवणूकदाराबरोबरच परकीय गुंतवणूकदार भांबावले आहेत.
टायटन, टेक महिंद्रा, मारुती सुझुकी, विप्रो, नेस्ले, टीसीएस, लार्सन अँड टुब्रो, टाटा स्टील, एचडीएफसी बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. मात्र अशा परिस्थितीतही डॉक्टर रेड्डीज, एशियन पेंट्स, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, स्टेट बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी हानी टळली. काल मुख्य निर्देशांकांची पाव टक्क्यांची हानी झाली होती.
परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्री
भारतीय अर्थव्यवस्थेत रुपयाच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक रुपया घसरत असल्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना परवडत नाही. त्यामुळे हे गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. काल या गुंतवणूकदारांनी 1,740 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. हे गुंतवणूकदार बळकट चलनामध्ये गुंतवणूक करीत आहे. त्यामध्ये डॉलरचा समावेश आहे. त्याचबरोबर अमेरिकन कर्जरोख्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्याचे विश्लेषकांनी सांगितले.