जोहान्सबर्ग – दक्षिण आफ्रिकेचा नवोदित क्रिकेटपटू जुबेर हमजा याच्यावर डोपिंगचे आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांचा त्याने इन्कार केला नसून अनवधनाने हे घडल्याचे मत व्यक्त करत आयसीसीच्या चौकशीला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. त्याला आता हे कसे घडले व त्यात त्याने कोणतीही चूक केलेली नाही हे सिद्ध करावे लागणार आहे.
आयसीसीच्या डोपिंग विरोधी समितीने जुबेरला वारंवार अमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. या वर्षी 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग चाचणी करण्यात आली होती. त्यात तो पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. याप्रकरणी त्याने आयसीसीच्या समितीसमोर आपले मत मांडले आहे आणि निलंबनाच्या कारवाईला सामोरे जाण्यास तयार असल्याचेही सांगितले.
जुबेरच्या शरीरात फ्योरोसेमाइट हा पदार्थ आढळला असून, त्याच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही हे त्याला सिद्ध करावे लागणार आहे. जुबेरने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 6 कसोटी आणि 1 एकदिवसीय सामना खेळला आहे.
कसोटीत त्याने 212 धावा केल्या असून, 62 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. 2019 सालच्या भारत दौऱ्यात त्याने ही खेळी रांची कसोटीत केली होती. त्याने नेदरलॅंड विरुद्ध एकदिवसीय सामना खेळताना 56 धावांची खेळी केली होती.