नवी दिल्ली – देशातील पारशी समुदायाची लोकसंख्या घटली असल्याची माहिती आज सरकारच्यावतीने संसदेत देण्यात आली. जनगणनेच्या आकडेवारीनुसार पारशी समुदायाची लोकसंख्या 2001 च्या जनगणनेतील 69,601 वरून 2011 च्या जनगणनेमध्ये 57,264 इतकी कमी झाली. अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय भारतातील पारशी लोकसंख्येतील घट रोखण्यासाठी “जियो पारसी’ योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत मिळालेल्या सहाय्यातून आत्तापर्यंत 359 बालकांचा जन्म झाला आहे.
अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या “जियो पारसी’ योजनेंतर्गत प्रजनन क्षमता असलेल्या जोडप्यांचे समुपदेशन, विवाह, कौटुंबिक आणि ज्येष्ठ समुपदेशन केले जाते. यात नातेसंबंध व्यवस्थापन, पालकत्व, औषध जागरुकता इत्यादी कार्यशाळेचा समावेश आहे. याशिवाय समुदायाचे आरोग्य-पाळणाघर, बाल संगोपन, वृद्धांना मदत इत्यादीवरील खर्चासाठी पारशी पालकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. वैद्यकीय सहाय्य- सहाय्यक गर्भधारणा तंत्रज्ञानासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूदही या योजनेत आहे.
ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा कमी आहे आणि त्या कुटुंबात वृद्ध सदस्य देखील आहेत अशा पारशी जोडप्यांना आतापर्यंत एकूण 224.61 लाख रु. पेक्षा जास्त आर्थिक मदत दिली गेली आहे. 115 पारशी जोडप्यांना हे पाठबळ देण्यात आले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.