नवी दिल्ली – ऑस्ट्रेलियाचा माजी कसोटी क्रिकेटपटू व आयपीएल स्पर्धा गाजविणारा चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू शेन वॉटसन याला दिल्ली कॅपिटल्सने सहाय्यक प्रशिक्षक म्हणून करारबद्ध केले आहे. गेल्या वर्षीच्या मोसमानंतर वॉटसनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली होती.
दरम्यान, आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजेतेपद मिळवेल, असा विश्वास प्रमुख प्रशिक्षक रिकी पॉंटिंग यांनी व्यक्त केला आहे. दिल्लीला या स्पर्धेत एकदाही विजेतेपद मिळवता आलेले नाही. मात्र, यंदा हा दुष्काळ संपेल असेही पॉंटिंग यांनी म्हटले आहे.
2008 सालापासून आयपीएलचा भाग असलेल्या दिल्लीने आतापर्यंत फक्त एकदाच अंतिम फेरी गाठली आहे. याआधी संघाचे नेतृत्व गौतम गंभीर, वीरेंद्र सेहवाग व श्रेयस अय्यर यांच्याकडे होते तरीही संघाला विजेतेपदाने हुलकावणी दिली आहे.