मुंबई -आयपीएल स्पर्धेत 2014 साली वयाच्या 40 व्या वर्षी पदार्पण केलेल्या प्रविण तांबे या क्रिकेटपटूच्या आयुष्यावर आधारीत एक चित्रपट लवकरच प्रदर्शित होत आहे. या बायोपिकचीच सध्या सर्वत्र प्रचंड चर्चा सुरु झाली आहे.
“कौन प्रवीण तांबे?’ असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकतंच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून, मराठमोळा अभिनेता ‘श्रेयश तळपदे’ प्रवीण तांबे यांची मुख्य भूमिका साकारताना दिसत आहे. या चित्रपटात श्रेयशची एक अनोखी शैली पाहायला मिळत आहे. “कौन प्रवीण तांबे?’ माध्यमातून श्रेयस जवळपास 17 वर्षांनंतर पुन्हा एकदा क्रिकेटपटूच्या भूमिकेत दिसणार आहे. याआधी तो ‘इक्बाल’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
भारतीय क्रिकेटपटूंच्या कारकीर्दीवर तसेच जीवनावर चित्रपट येऊन गेले. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, महेंद्रसिंह धोनी यांच्यावर आधारीत चित्रपट यशस्वीही ठरले.
लेगस्पिन गोलंदाज असलेल्या तांबेने 2014 साली अहमदाबाद येथे कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध हॅटट्रिक घेतली व तो नावारुपाला आला. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाइट रायडर्सकडून तो खेळला आहे.