लखनौ – देशातील पहिल्या दलित मुख्यमंत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मायावतींच्या बहुजन समाज पार्टीने उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीत आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केल्याची नोंद झाली आहे. मायावतींच्या बसपाने आताच्या निवडणूकीत सर्वच्या सर्व 403 जागांवर आपले उमेदवार उभे केले मात्र केवळ एका जागेवर त्यांना विजय मिळवता आला.
2017 च्या विधानसभेच्या निवडणूकीत बसपाला 19 जागांवर विजय मिळवता आलेला होता. आता त्यांना त्यापैकी 18 जागावर देखील पराभव मिळाला आहे. ही बसपाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी ठरली आहे.
बसपाने 2007 साली 206 जागांवर विजय मिळवून उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन केली होती. तेंव्हा बसपाला मिळालेल्या मतांची टक्केवारी 30 टक्के होती.
पूर्वाश्रमीच्या शिक्षिका असलेल्या बहेनजी अर्थात मायावती 1995 मध्ये सर्वात प्रथम उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. मात्र त्यांचे हे सरकार फारच कमी दिवस सत्तेत राहिले होते. त्यानंतर तीनवेळा भाजपच्या मदतीच्या आधारे मुख्यमंत्रीही बनण्याची संधी मिळाली होती. 2007 मध्ये त्यांनी सर्वाधिक जागा मिळवून मुख्यमंत्रीपदही मिळवले. त्यावेळी त्यांनी “सोशल इंजिनिअरींग’चा केलेला प्रयोग नक्की यशस्वी झाला होता. मात्र भाजपशी मैत्री सोडल्यावर त्यांना स्वतःचा पक्ष पुन्हा उभे करणे जमलेच नाही.
यंदाच्या निवडणूकीत मायावतींचा प्रभाव अगदी नगण्य होता. तो इतका कमी होता की अखिलेश यादव हे तर “मायावती भाजपला मदत करण्यासाठी निवडणूक लढवत आहेत,’ अशी टीका करायला लागले होते. त्याचा दृश्य परिणाम निवडणूक निकालामध्ये बघायला मिळाला आणि बसपाचा हत्ती अगदी खाली बसला.