पुणे – ५ राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली असून सुरुवातीचे कल हाती आले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार ५ पैकी ४ राज्यांमध्ये भाजप तर पंजाबमध्ये आप आघाडीवर असल्याचं दिसतंय. अशातच देशाच्या राजकारणात महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या उत्तर प्रदेशात देखील भाजपने आघाडी घेतली आहे. उत्तर प्रदेशात भाजप २६४ जागांवर आघाडीवर असून १२७ जागांवरील आघाडीसह समाजवादी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. भाजपला सुरुवातीला मिळत असलेल्या आघाडीवरून आता पक्षातील नेत्यांनी भाजप राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
अशातच पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील, उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्ता स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करत योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. महापौर मोहोळ यांनी आपल्या ट्विटर खात्यावर याबाबत पोस्ट करताना, “राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी !” असा संदेश दिला आहे. सोबतच त्यांनी योगी आदिथयनाथ यांचा विजयी मुद्रेतील फोटो पोस्ट करून त्यांचे अभिनंदन केले आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशातून निवडणूक निकालांबाबत हाती आलेल्या आकडेवारीनुसार भाजप सध्या निम्म्याहून अधिक जागांवर आघाडीवर असल्याचं दिसतंय. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या एकूण ४०३ जागा आहेत. १९८५ पासून राज्यातील जनतेने कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा जनादेश दिलेला नाही. आजच्या निकालांमध्ये जर भाजपला बहुमत मिळाले तर ही १९८५ पासूनची परंपरा खंडित होणार आहे.
राजतिलक की करो तैयारी, आ रहे हैं भगवाधारी !#BJP4PMC #योगी @myogiadityanath pic.twitter.com/HUFaaJURTA
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 10, 2022
पंजाबमध्ये आपचा जलवा; काँग्रेस भुईसपाट
पंजाब विधानसभा निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार कामगिरी केल्याचे दिसत आहे. आपला सध्या विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी ९० जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेसला केवळ १८ जागांवर आघाडी असल्याचे दिसत आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकांमध्ये काँग्रेसने राज्यात ७७ जागा जिंकत बहुमताचा ५९ जागांचा आकडा सहज पार केला होता. यंदा मात्र पंजाबच्या जनतेचा कल आपच्या खात्यात जाताना दिसतोय.