पुणे –पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा जवळ येत असतानाच महापालिकेच्या आवारात होणाऱ्या कार्यक्रमासाठी उपस्थितांच्या संख्येवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. महापालिकेच्या आवारात बसविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी केवळ 25 जणांनाच उपस्थित राहता येणार असल्याचे सुरक्षा यंत्रणाकडून महापालिकेस कळविण्यात आले. त्यामुळे, केवळ काही ठरावीक जणांनाच या कार्यक्रमासाठी उपस्थित राहता येणार असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. मर्यादित उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची बडदास्त ठेवण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांऐवजी पंतप्रधानांची प्रतिमा उठावदार करण्यासाठी भाजपने हा घाट घातला असल्याची टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केली.
महापालिकेत 25 जणांनाच परवानगी
आम्ही या कार्यक्रमासाठी 200 जणांच्या उपस्थितीची मागणी केली. तर सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून जास्तीत जास्त 30 ते 40 जणांनाच परवानगी देण्याची भूमिका घेतली आहे. महापालिकेच्या आवारात कार्यक्रम असला तरी प्रत्यक्षात तिथे कोणतेही स्टेज नाही. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यामुळेच, हा कार्यक्रम मोठा व्हावा यासाठी आपण स्वत: 200 जणांच्या उपस्थितीची मागणी केली आहे. याला उगाच राजकीय रंग दिला जात असून गैरसमज पसविण्याचे काम केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा “एमआयटी’मध्ये होणार आहे. तसेच, पोलिसांसोबत उपस्थिती वाढविण्याबाबत चर्चाही सुरू आहे. – मुरलीधर मोहोळ, महापौर