नवी दिल्ली – माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने एफएम रेडिओ चॅनेल्सना अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेतील प्रसारण न करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशाराही मंत्रालयाने दिला आहे.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, अनेक एफएम रेडिओ चॅनेलवर अश्लील आणि आक्षेपार्ह शब्द वापरले जातात असे आमच्या निदर्शनाला आले आहे. अनेक रेडिओ जॉकींनी वापरलेली भाषा असभ्य, दुहेरी अर्थाची आणि आक्षेपार्ह आहे अनेकदा बदनामीकारक आणि अपमानजनक टिप्पण्या या प्रसारणातून केल्याल जातात असे मंत्रालयाने म्हटले आहे.
या वाहिन्यांना परवानगी देताना सरकारकडून त्यांच्याशी जो करार करण्यात आला आहे त्यातील कलम 7.6 मध्ये त्यांच्यावर सभ्य भाषेचा वापर करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या चुकीच्या भाषेच्या आधारावर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असे मंत्रालयाने म्हटले आहे.