मुंबई – राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, मुंबई पोलीस आयुक्तपदी संजय पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त असलेल्या हेमंत नगराळेंची बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र सरकारने संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली. ते मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची जागा घेतील. परमवीर सिंह यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरुन पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांच्या जागी नगराळेंनी या पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यानंतर पांडे यांची महाराष्ट्राच्या महासंचालक पदी वर्णी लागली होती.
संजय पांडे हे 1986च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी आयआयटी कानपूरमधून आयटी कॉम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. त्यानंतर मुंबईत डीसीपी रॅंकचे अधिकारी झाले. 1992-93 दंगलीच्या वेळी कृष्णा आयोगाच्या अहवालात चांगल्या कामाचा उल्लेख करण्यात आला. मुंबईतील 4 हायप्रोफाईल पोलीस स्टेशनचे 8 झोन बनवण्यात आले होते, त्याचे पहिली डीसीपी बनण्याचा मान संजय पांडे यांना मिळाला होता.
1998मध्ये शिक्षणासाठी हॉवर्ड विद्यापीठात गेले, तिथे पदव्युत्तर शिक्षण घेतले. 1999मध्ये एसपीजी असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या सुरक्षेत तैनात होते. 2001मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेले, अखेर कोर्टातील लढ्यानंतर 2011 पुन्हा सेवेत रुजू झाले. 2015मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले. त्यानंतर 9 एप्रिल 2011 संजय पांडे यांना महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. अखेर आता त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली.