मुंबई – उद्योगपती राज कुंद्राच्या मालकीच्या विआन इंडस्ट्रिजमधील चार कर्मचाऱ्यांनी माफीचे साक्षिदार होण्याची तयारी दर्शवली असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यातच त्याच्या अंधेरी येथील कार्यालयात चार छुपी कपाटे सापडली. त्यात सापडलेल्या माहितीचा तपशील अद्याप समजू शकला नाही. दरम्यान, परकीय चलन नियामक कायद्याअंतर्गत राज कुंद्रा यांच्यावर खटला दाखल केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात अंमलबाजावणी संचनालय (ईडी) तपास सुरु करणार आहे.
या प्रकरणात राज कुंद्रा यांना FEMA अंतर्गत नोटीस समन्स बजावले जाऊ शकते. या प्रकरणात, कंपनीच्या संचालकांची देखील चौकशी होऊ शकते. शिल्पा शेट्टीची भूमिका पाहिल्यास तिचीही चौकशी होणार असल्याची शक्यता आहे.
या प्रकरणात हॉटशॉटसाठी ॲपलकडून १ कोटी १३ लाख ६४ हजार ८८६ रुपये मिळाले होते. त्यानुसार, हे पैसे कुंद्राच्या कोटक महिंद्रा बँकेत जमा झाल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कुंद्राच्या सिटी बँक आणि कोटक महिंद्रा बँकेचे खाते गोठविण्यात आले आहे, तसेच गुगलवरील व्यवहाराची माहिती येणे बाकी असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, राज कुंद्रा याला तातडीने दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. सरकारी वकिलांची बाजू ऐकल्याशिवाय कोणताही दिलासा देणार नाही, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. कुंद्राने त्याच्या अटकेला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकेवर २९ जुलैपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश न्या. अजय गडकरी यांच्या एकलपीठाने पोलिसांना दिले.