प्रयागराज -उत्तर प्रदेशात भारतीय जनता पार्टी पुन्हा सत्तेवर आली तर येथील नागरिकांना दिवाळी आणि होळीच्यावेळी प्रत्येकी एक गॅस सिलिंडर मोफत दिला जाईल, असे आश्वासन भाजपचे नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज येथील प्रचार सभेत बोलताना दिले. ते म्हणाले की, मोदींचे सरकार सत्तेवर आल्यानंतर येथील लाखो घरांमध्ये मोफत गॅस कनेक्शन दिले गेले आहे. धर्म आणि जातीच्या आधारावर राजकारण करणाऱ्यांपासून शहा यांनी जनतेला सावध राहण्याचा इशारा दिला. समाजवादी पक्षाच्या नेत्यांच्या डोळ्यावर जो एक चष्मा आहे त्यातून त्यांना एकाच समूहाचे लोक दिसतात. तुम्ही आणि आम्ही त्यांना यातून दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच गरीब आणि मागासलेल्या समाजाचे भले करू शकते असे ते म्हणाले.
करोनाच्या काळात मोदी सरकार देशातील जनतेचे लसीकरण करून लोकांना करोनामुक्त करण्याच्या प्रयत्नात असताना अखिलेश यादव यांनी लोकांना ही लस घेऊ नका असा सल्ला दिला होता, असा आरोपही त्यांनी केला. लसीची खिल्ली उडवणाऱ्यांनी पुढे दहा दिवसांनी अंधारात स्वत:चे लसीकरण करून घेतल्याची खिल्लीही त्यांनी उडवली.
उत्तर प्रदेशातील विकासाबाबत बोलताना शहा म्हणाले, “कॉंग्रेस, सपा आणि बसपने या राज्यात 70 वर्षे राज्य केले, परंतु गरिबांना शौचालयेही मिळालेली नाहीत. योगी सरकार सत्तेवर आल्यावर शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आणि आज पुरेशी वीजही राज्यात उपलब्ध आहे त्यामुळे घराघरात वीज पोहोचू शकली आहे असे ते म्हणाले.