लखनौ – उत्तर प्रदेशात सरकारविरोधी लाट नसून सरकारला अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे आताच्या विधानसभा निवडणुकीत भाजप रेकॉर्डब्रेक कामगिरी करेल, असा दावा उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी सोमवारी केला.
मागील विधानसभा निवडणुकीत (2017) घवघवीत यश मिळवून भाजपने उत्तर प्रदेशची सत्ता काबीज केली. त्यावेळी पक्षाने 403 पैकी तब्बल 312 जागा जिंकल्या. मात्र, यावेळची निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याचे बोलले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर, पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत शर्मा यांनी भाजपच्या मोठ्या विजयाबद्दल विश्वास व्यक्त केला.
आमच्या सरकारने उत्तर प्रदेशात चांगले कार्य केले. त्यामुळे राज्यभरात आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या प्रचार सभांना मोठी गर्दी होत आहे. यावेळी भाजप नव्हे; तर जनताच निवडणूक लढवत आहे.
आमचे उमेदवार नव्हे; तर पक्षाचे चिन्ह निवडणूक लढवत आहे. इतर सर्व पक्ष दुसरे स्थान मिळवण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्या सर्व पक्षांना मिळणाऱ्या एकूण जागांची बेरीज तीन आकड्यांचा पल्लाही गाठू शकणार नाही, असे भाकीत त्यांनी केले.