सहारणपूर, (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशच्या विधानसभेच्या निवडणूकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज झालेल्या मतदानादरम्यान एक आजी चक्क ऍम्ब्युलन्समधून आल्या. स्ट्रेचरवर झोपवूनच त्यांना मतदानासाठी नेण्यात आले. त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदानादरम्यान या आजींचीच चर्चा सगळीकडे सुरू होती.
70 वर्षीय नरेश चौहान या भाजपचे नगरसेवक पुनीत चौहान यांच्या मातोश्री आहेत. त्या खूप आजारी आहेत. उपचारांसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र आपल्याला मतदान करायचे आहे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यामुळे रुग्णालयातूनच त्यांना ऍम्ब्युलन्समधूनच मतदान केंद्रावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली आणि स्ट्रेचरवरून त्याना मतदान बुथमध्ये नेण्यात आले. मगच नरेश चौहान यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. केवळ आपल्या आईची ईच्छा म्हणून ही सर्व व्यवस्था करण्यात आल्याचे पुनीत चौहान यांनी सांगितले. मतदानानंतर चौहान यांना पुन्हा रुग्णालयात आणण्यात आले.