पुणे – चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेत स्वीडनच्या क्वालिफायर एलियास येमेर याने अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत 15 व्या स्थानी असलेल्या रशियाच्या ऍस्लन कारास्तेवचा सरळ सेटमध्ये पराभव करून दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या फेरीत येमेरने कारास्तेवचा 6-2, 7-6 (7-3) असा पराभव करत अवघ्या 1 तास 36 मिनिटात त्याचे आव्हान संपुष्टात आणले. 25 वर्षीय पात्रता फेरीतून मुख्य फेरीत प्रवेश केलेल्या येमेरने सामन्यात सुरेख सुरुवात करत कारास्तेवविरुद्ध 3-1 अशी आघाडी घेतली. महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या दक्षिण आशियातील एकमेव 250 एटीपी स्पर्धेत आपला पहिला सामना खेळत असलेल्या कारास्तेवला लय गवसण्यात अडचणी येत होत्या. रशियाचा स्टार खेळाडू कारास्तेवने गतवर्षी सर्बिया ओपन टेनिस स्पर्धेत जागतिक अव्वल मानांकित खेळाडू नोव्हाक जोकोविचवर सनसनाटी विजय मिळवला होता. पण येमेरने मात्र, त्याला सरस खेळाच्या जोरावर पराभूत केले.
याशिवाय, अन्य लढतीत पहिल्या फेरीत पुढे चाल मिळालेल्या गतविजेत्या जेरी व्हेसलीने बर्नाबी झपाटा मिराईल्सचा 6-3, 6-4 असा सहज पराभव करून विजयी सलामी दिली. सहाव्या मानांकित एमिल रुसूवोरी याने क्वालिफायर वित कोप्रिव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करून आगेकूच केली. आयएमजीच्या मालकीच्या आणि राईज वर्ल्डवाईद इन इंडिया संचालित या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत आज संध्याकाळी भारताचा स्टार खेळाडू युकी भांब्री समोर आठव्या मानांकित स्टेफनो ट्रॅव्हालियाचे आव्हान असणार आहे.
याआधीच्या दुहेरीच्या बुधवारी रात्री उशिरा झालेल्या सलामीच्या लढतीत एन श्रीराम बालाजी व विष्णू वर्धन या जोडीने अर्जुन कढे व पूरव राजा यांचा 6-1, 6-4 असा पराभव करून विजय मिळवला. बालाजी व वर्धन या भारतीय जोडीला जियानलुका आणि एमिल रुसूवोरी यांनी दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली असल्यामुळे थेट उपांत्य फेरीत प्रवेश देण्यात आला आहे.