नवी दिल्ली -विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या पाच राज्यांमधील जाहीर सभा आणि रोड शोवरील बंदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. त्याच वेळी पहिल्या दोन टप्प्यांतील प्रचारासाठी काही सवलती देण्यात आल्या आहेत.
उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूरमधील निवडणुकांचा कार्यक्रम 8 जानेवारीला जाहीर करण्यात आला. मात्र, करोना संकट ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने गर्दी टाळण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत जाहीर सभा, रोड शो आयोजित करण्यास मनाई केली. त्या बंदीची मुदत 22 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. ती संपल्यानंतर शनिवारी आयोगाने बंदीच्या मुदतीत पुन्हा वाढ केली.
अर्थात, घरोघर प्रचारासाठीच्या नियमांत काही बदल करण्यात आले. याआधी घरोघर प्रचारासाठी 5 जणांनाच परवानगी देण्यात आली होती. आता तशाप्रकारच्या प्रचारात 10 जण सहभागी होऊ शकतील. त्याशिवाय, पहिल्या दोन टप्प्यांत मतदान होणाऱ्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेता येऊ शकतील.
त्यासाठी जास्तीत जास्त 500 जण उपस्थित राहू शकतील. पहिल्या टप्प्यासाठी 10 फेब्रुवारीला, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 14 फेब्रुवारीला मतदान होईल. त्यासाठी अनुक्रमे 28 जानेवारीपासून आणि 1 फेब्रुवारीपासून मर्यादित संख्येतील सभांना परवानगी देण्यात आली आहे.