राजगुरूनगर – खेड तालुक्यात मागील 24 तासांत 3 नगरपरिषदा व 29 गावांत 178 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत त्यामुळे पुणे जिल्ह्यात खेड तालुका पुन्हा करोनाचा हॉटस्पॉट बनला आहे.
खेड तालुक्यात तिसरी करोनाच्या लाटेने थैमान घालायला सुरुवात केली आहे. दररोजची पॉझिटिव्ह रुग्णाची वाढती संख्या आणि नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन यामुळे तालुका पुन्हा हॉटस्पॉट बनला आहे.
तालुक्यात चाकण एमआयडीसी, सेझ, डब्ल्यूएमडीसीमध्ये मोठ्या संख्येने देशी-विदेशी कंपन्या असल्याने त्यात काम करणाऱ्या कामगारांचे देश विदेशात जाणे येणे हे करोनाच्या तिसऱ्या लाटेचे कारण बनले.
दिवाळीनंतर बाजारपेठा खुल्या झाल्या नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्स न पाळल्याने आणि लग्न, दशक्रिया, वाढदिवस धुमधडाक्यात साजरे केल्याने तालुक्यात करोनाच्या तिसऱ्या लाटेचे आगमन होऊन आता तालुका हॉटस्पॉट बनला आहे.
तालुक्यात एकीकडे करोनाची संख्या झपाट्याने वाढत असताना त्यांना उपचारासाठी कोविड सेंटर बाबत अजून आवश्यक ती तयारी झाली नाही. मोठ्या संख्येने रुग्णसंख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालये फुल्ल होत आहेत.
भविष्यात उपचाराचा वानवा निर्माण होणार आहे. तालुक्यात मोठ्या क्षमतेचे कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. तालुक्यात आतापर्यंत 36 हजार 996 जण पॉझिटिव्ह आहेत. त्यापैकी 35 हजार 402 जणांनी करोनावर मात केली आहे. तर 593 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.