बरेली – कॉंग्रेसने उत्तरप्रदेशातील निवडणुकीसाठी महिला संघटन सुरू केले असून त्यासाठी त्यांनी लडकी हूॅ लड सकती हूॅचा नारा दिला आहे. या अंतर्गत आता ठिकठिकाणी महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धाही आयोजित केल्या जात आहेत. त्या स्पर्धांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. अशाच पद्धतीने आज बरेली शहरातही महिला मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली होती त्याला महिलांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की तेथे आज चेंगराचेंगरीचा प्रसंग उद्भवला.
यातून अनेक महिला रस्त्यावर पडल्या, मात्र सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या घटनेच्या संबंधात काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की महिलां दौड सुरू झाल्यानंतर काही अंतर पळल्यानंतर यातील सहभागी काही ज्येष्ठ महिला रस्त्यावर दमून पडल्या.
मागून येणारा लोंढा त्यांच्या अंगावर पडल्याने चेंगराचेंगरीचे वातावरण निर्माण झाले, पण स्वयंसेवकांनी त्यावर नियंत्रण मिळवून बाकीची स्पर्धा पुढे सुरू ठेवली. बरेलीच्या माजी महापौर सुप्रिया अरोन यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
त्यात अनेक महिला मास्क न घालताच सहभागी झाल्या होत्या. त्याविषयी त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, वैष्णव देवी सारख्या ठिकाणी हजारो यात्रेकरू असेच जातात. या उपक्रमासाठी मुली काही काळ घराच्या बाहेर मोकळेपणाने धावण्यासाठी आल्या होत्या. त्यामुळे हा अगदी स्वाभाविक प्रकार आहे.