पुणे (प्रतिनिधी) – हवेली तालुक्यातील वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीस शासनाकडून मंजूरी देण्यात आली असून निधीही मंजूर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर तुळापूर येथील स्मारकाचा प्रस्तावित आराखडा तयार असून तो वरिष्ठ कार्यालयाकडे सादरही करण्यात आलेला आहे. त्यानुसार तुळापुरातील स्मारकासही आराखड्याप्रमाणे तातडीने निधी मंजूर करावा, अशी मागणी पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी केली असता छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापुरातील स्मारकासही निधी मंजुर केला जाईल, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे.
तुळापूर आणि वढु बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक साकारण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात नुकतीच विशेष बैठक घेण्यात आली. यामध्ये वढु बुद्रुक येथील स्मारकाच्या आराखड्यावर चर्चा होऊन 50 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे, या निर्णयाचे स्वागत आहे. या अनुषंगाने तुळापुरातील स्थानिक ग्रामस्थांसह शंभुभक्तांच्या भावनांचा विचार करून तुळापूर येथील प्रस्तावीत स्मारकाच्या आराखड्यासही निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी विनंती पर्यटनमंत्री ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे ज्ञानेश्वर कटके तसेच माऊली शिवले यांनी केली आहे.
तुळापुर ग्रामपंचायतीकडूनही यासंदर्भात निवेदन देण्यात आले असून सरपंच ऍड. गुंफा इंगळे, उपसरपंच नवनाथ शिवले, सदस्य दत्तात्रय खैरे, शिवाजी शिवले, अर्चना पुजारी, सुवर्णा राऊत, सुनिता शिवले, सुरेखा शिवले, सुनिता नवनाथ शिवले यांनीही तुळापुरातील स्मारकाबाबत निधीची मागणी केली आहे.
दरम्यान, पर्यावरण-पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आज पुणे दौऱ्यावर होते. या अनुषंगाने जिल्हा शिवसेना प्रमुख ज्ञानेश्वर कटके, माऊली शिवले यांच्यासह मान्यवरांनी आदित्य ठाकरे यांची भेट घेत तुळापुरातील स्मारकाचा आराखडा तसेच त्याअनुषंगाने चर्चा करून याबाबत निधी मंजूर करावा, अशी विनंती केली. यावर याबाबत तातडीने हालचाली करण्यात येतील, निधी मंजुरीबाबत प्रयत्न सुरू असल्याचे ठाकरे यांनी कटके यांच्यासह उपस्थितांना सांगितले.
तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी, त्यावर नतमस्तक होण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून स्मारकाचे तसेच परिसराच्या विकासाचे काम तातडीने करण्यात यावे. यासाठी निधी मंजूर करण्यात यावा.
ज्ञानेश्वर कटके, शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जि.प.सदस्य