पुणे – विख्यात फॉर्च्युन 500 इंडियाच्या यादीत पु. ना. गाडगीळ आणि सन्स लि. (पीएनजी सन्स)चा समावेश झाला आहे. 2012 मध्ये पीएनजी सन्सची स्थापना झाल्यापासून दहा वर्षांच्या आता कंपनीने ही कामगिरी केली आहे. पीएनजी सन्सचा फॉर्च्युन 500 इंडियाच्या यादीत 471 वा क्रमांक असून, महाराष्ट्रातून या यादीत समाविष्ट होणारी पीएनजी सन्स जेम्स व ज्वेलरी क्षेत्रातील पहिलीच कंपनी आहे.
कंपनीचे संचालक-सीईओ अमित मोडक म्हणाले, की ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. 1958 मध्ये सुरू झालेल्या पु ना गाडगीळ आणि कंपनीच्या विभाजनानंतर 2012 मध्ये पु ना गाडगीळ आणि सन्स (पीएनजी सन्स) अस्तित्वात आली. केवळ 2 दालने, 200 कर्मचारी व रु. 300 कोटींची उलाढाल व 13 कोटी रुपयांचा नफा असणाऱ्या कंपनीचा विस्तार 3 राज्ये 23 शहरांतून 29 दालनांच्या माध्यमातून झाला असून, कर्मचारी संख्या 1100 व उलाढाल 2100 कोटी रुपये आणि करोत्तर नफा 130 कोटी रुपयांवर पोचला आहे.
हे आम्ही चांगले काम करीत असल्याचे एक प्रतीक आहे, असे पीएनजी सन्सचे संस्थापक-संचालक अजित गाडगीळ यांनी नमूद केले. पारंपरिक सराफी पेढी असूनही अजित गाडगीळ आणि डॉ. रेणू गोडगीळ यांनी व्यावसायिक व्यवस्थापन शैली आत्मसात केली. तसेच, सर्वोत्तम व्यावसायिक नेतृत्व गुण असलेल्या व्यक्तीच्या हातात कंपनीचे संपूर्ण संचालन व निर्णय घेण्याची मुक्तता दिली.
प्रवर्तकांनी घेतलेला निर्णय कंपनीसाठी कलाटणी देणारा ठरला. 2017 मध्ये भागीदारी स्वरूप असणारी पीएनजी सन्स पब्लिक लिमिटेड कंपनी झाली. वाढीला बळ देण्यासाठी कॉर्पोरेट शैली आणताना सुरवातीला 6 जणांची एचओडी टीम होती आणि त्यानंतर कंपनीचा विस्तार होताना ही संख्या 14 पर्यंत पोचली आहे. आता आम्ही कंपनीत नव्या नेतृत्वास प्रोत्साहन देत आहोत, असे मोडक यांनी नमूद केले.
जेम्स आणि ज्वेलरी क्षेत्रातील व्यवहारात सर्वाधिक पारदर्शिता असणारी पीएनजी सन्स कंपनी आहे. व्यवसाय विस्तार होत असताना भेदभाव न करता महिलांनाही संधी देण्यात आली. पीएनजी सन्सच्या सर्वाधिक विक्री उत्पन्न देणाऱ्या चिंचवड व नाशिक दालनाचे नेतृत्त्व महिलांकडे आहे.