मुंबई – भारताचा माजी कसोटी क्रिकेटपटू विनोद कांबळीची सायबर चोरांकडून 1 लाख 13 हजार 998 रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. केवायसी अपडेट करण्याचे कारण देत कांबळीच्या बॅंक खात्यामधून सायबर चोरांनी हे पैसे काढून घेतल्याचे समोर आले आहे. याबाबत त्याने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांबळीच्या मोबाइलवर 3 डिंसेबरला एका व्यक्तीने फोन करत कोटक महिंद्रा बॅंकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्याने बॅंक खात्याचे केवायसी परिपूर्ण नसल्याचे सांगत त्याने पाठवलेल्या एका लिंकवर कांबळीने आपली कागदपत्रे व अन्य माहिती दिली. या लिंकवरील जाऊन एनीडेस्क ऍप डाऊनलोड करून त्यावर आलेला ओटीपी देण्यास सांगितले.
ओटीपी देताच त्या व्यक्तीने कांबळीच्या मोबाइलचा संदर्भ घेतला व पैसे काढले. खात्यातून पैसे गेल्याचे लक्षात येताच कांबळीने या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा फोन बंद असल्याचे व आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले. यानंतर त्याने तातडीने पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंद केली. याबाबत सायबर सेलच्या पोलीसांकडून तपास सुरु आहे.