बीजिंग – संवेदनशील विषयाचे वार्तांकन केल्याबद्दल चीनमधील 127 पत्रकारांना ताब्यात घेण्यात आले आहे. देशातील संवेदनशील विषयांचे वार्तांकन आणि प्रसिद्धी केल्याबद्दल या पत्रकारांना आणि सामाजिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे “रिपोर्टर्स विदाउट बॉर्डर्स’ या बिगर शासकीय संघटनेने म्हटले आहे.
जेविषय सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीला अडचणीचे ठरू शकतात, अशा विषयांना चीनमध्ये संवेदनशील म्हणून संबोधले जाते. अशा विषयांचे वार्तांकन, शोधपत्रकारिता आणि प्रसिद्धी दिल्याबद्दल अनेक वर्षांपर्यंत तुरुंगात डांबले जाऊ शकते. या काळात मिळणाऱ्या हीन वागणूकीमुळे प्रसंगी मृत्यूही संभवू शकतो, असेही या बिगर शासकीय संघटनेच्या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
ताब्यात घेतल्या गेलेल्या 127 जणांपैकी 71 जण उघ्युर पत्रकार आहेत. चीनमध्ये 2016 पासून दहशतवादाविरोधातील लढाईच्या नावाखाली उघ्युरांविरोधात मोठे हिंसक अभियानच चालवले जात आहे. चीनमदील प्रसिद्धी माध्यमांना सत्तारुढ कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र कशाप्रकारे बनवले जात असते, याचा साद्यंत वृत्तांतच या अहवालात प्रसिद्ध केला गेला आहे. पत्रकारांना त्यांचे ओळखपत्राचे नूतनीकरण करण्यासाठी वर्षभरामध्ये 90 तासांचे शी जिनपिंग यांच्या विचारांवर केंद्रीत असलेले प्रशिक्षण पूर्ण करावे लागते.
“स्टडी शी’ हा अभ्यासक्रम पत्रकारांना डाउनलोड करावा लागतो. परदेशी पत्रकारांना धमकावणे आणि त्यांचा व्हिसा नुतनीकरण न करण्यामुळे 2020 मध्ये 18 परदेशी पत्रकारांना माघारी जावे लागले होते. बुहानमधील करोना स्थितीचे वार्तांकन केल्याबद्दल 10 पत्रकारांना अटक करण्यात आली होती.