पिंपरी -सध्या कांद्याचे दर वाढत आहे आणि नवी मुंबईतील एपीएमसी बाजारात इराणचा कांदा दाखल झाला आहे. त्यामुळे शहरातील बाजारातही आता इराणचा कांदा येईल, अशी चर्चा होत आहे.
परंतु स्थानिक पातळीवर होत असलेल्या देशी कांद्याचा पुरवठा पाहता तशी गरज पडणार नसल्याचे चित्र आहे. किरकोळ बाजारात कांद्याच्या भावाने प्रति किलोला चाळीशी गाठली असली, तरीदेखील पुणे जिल्ह्याबरोबरच अन्य जिल्ह्यातून कांद्याची पुरेशा प्रमाणात आवक होत असल्याने इराणचा कांदा दाखल होण्याची शक्यता खूपच कमी आहे. दोन वर्षांपूर्वी इराणचा कांदा मोशी उपबाजारात दाखल झाला होता.
मोशीतील नागेश्वर महाराज उपबाजारात जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, शिरुर तसेच कधीतरी मावळातून कांद्याची आवक होत असते. तर नगरमधून कांद्याची आवक होत असते. राज्यात झालेल्या अवकाळीचा फटका कांदा उत्पादनाला बसला आहे.
मात्र, तरीदेखील दररोज मोशीत दररोज सरासरी 30 क्विंटल कांदा दाखल होत असून, सार्वजनिक सुट्टीच्यादिवशी आवकेत मोठी वाढ होत असते. सद्यस्थितीत करोनाची दुसरी लाट ओसरली असून, हॉटेल व रेस्टॉरंट रात्री बारा वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी मिळाल्याने कांद्याला मागणी वाढली आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी कांद्याचे दर प्रतिकिलो 60 रुपयांवर पोहचले असताना, पुणे जिल्ह्यातून होणारी आवकदेखील कमी झाल्याने, मोशी उपबाजारात इराणचा कांदा दाखल झाला होता. देशी कांद्याच्या तुलनेत इराणच्या कांद्याच्या आकारात व चवीत फरक होता. मात्र, तरीदेखील देशी कांद्याच्या तुलनेत हा कांदा ओला असल्याने वजन अधिक असल्याने देशी कांद्याच्या तुलनेत काही प्रमाणात स्वस्त होता.
कांद्याचे दर वाढल्याने इराणवरून कांद्याची आयात करण्यात आली असून सोमवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा बाजारात 10 टन कांदा दाखल झाला आहे. मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे नवीन कांदा उत्पादनावर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे कांदाचे दर वाढलेले आहेत. घाऊक बाजारात 25 ते 30 रुपयांपर्यंत असलेला कांदा किरकोळ बाजारात 35 ते 40 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. आगामी काळात दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दोन वर्षांपूर्वी उन्हाळ्यात कांद्याची टंचाई भासत असल्याने, मोशी उपबाजारात इराणचा कांदा दाखल झाला होता. ग्राहकांची देखील त्याला पसंती मिळत होती. मात्र, सध्या पुणे जिल्ह्याच्या विविध भागांमधून दररोज पुरेशा प्रमाणात आवक होणाऱ्या कांद्यामधून शहराची कांद्याची गरज भागविली जात आहे. त्यामुळे इराणचा कांदा दाखल होण्याची शक्यता नाही.
– नीलेश लोखंडे, विभागप्रमुख, नागेश्वर महाराज उपबाजार, मोशी.