मराठमोळा अभिनेता सोमनाथ अवघडेच्या “फ्रॅंड्री’ या चित्रपटातील जब्या या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता तो लवकरच “फ्री हिट दणका’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
या चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण कथा, क्रिकेट, उत्तम संवाद, जबरदस्त अभिनय या सर्व गोष्टींमुळे या चित्रपटाचा ट्रेलर सगळीकडे गाजत आहे.
उघडेवाडी गावातील धुमाकूळ पाटील आणि निगडेवाडी गावातील अण्णा पाटील या दोन पाटील घराण्यांमध्ये वैमनस्य असून धुमाकूळ पाटीलाच्या मुलाचे अण्णा पाटीलांच्या मुलीवर प्रेम असल्याचे ट्रेलरमध्ये दिसत आहे.
या चित्रपटात सोमनाथ अवघडेसोबत अपूर्वा एस. देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे “सैराट’ चित्रपटातील सुपरहिट जोडी अरबाज (सल्या) आणि तानाजी (लंगड्या) तसेच सुरेश विश्वकर्मा, अनिल नगरकर, गणेश देशमुख हे देखील या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत.