पुणे -शहर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमान सातत्याने घटत आहे. गुरुवारीदेखील शहरातील किमान तापमान 4.8 अंशांनी घटून 10.9 अंशांवर पोहोचले. राज्यातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद पुण्यात झाली असून, पुणे महाबळेश्वरपेक्षाही थंड शहर ठरले.
शहर परिसरात रात्री आणि पहाटे सकाळच्या वेळी थंडीची जाणीव होत आहे. काही भागांमध्ये हलके धुकेही पडत असल्याने नागरिकांना गुलाबी थंडीची अनुभूती होत आहे. गुरुवारीदेखील शहर परिसरात हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद घेण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शहर परिसरात हवामान कोरडे असल्याने
उत्तरेकडूनयेणाऱ्या थंड हवेचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे हा परिणाम जाणवत आहे. मध्य आणि दक्षिण अरबी समुद्रालगतच्या भागावर कार्यरत असलेला कमी दाबाचा पट्टा आणि समुद्रसपाटीपासून 5.8 किमी उंचावर असलेली हवेची चक्रीय स्थितीचा परिणाम राज्यातील तापमानावर होण्याची शक्यता आहे.