नियामी – नायजरमधील माराडी शहरातील एका शाळेला भीषण आग लागली. या आगीत 20 मुलांचा मृत्यू झाला असून 12 हून अधिक जखमी झाले आहेत. एएफएन प्री-स्कूल आणि प्राथमिक शाळेत आग लागल्याने पेंढ्यापासून बनवलेले तीन वर्ग जळून खाक झाल्याची माहिती सरकारकडून सोमवारी उशिरा देण्यात आली. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये तीन ते आठ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. ही आग नेमकी कशी लागली याचा तपास सुरू आहे.
नायजरमधील युनिसेफचे प्रतिनिधी स्टेफानो सावी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘आम्ही या आगीमुळे बाधित मुले आणि कुटुंबांच्या पाठीशी उभे आहोत. पीडितांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या समुदायांप्रती आमची तीव्र संवेदना आहे.” ते म्हणाले, ‘शाळेत शिकत असताना कोणत्याही मुलाला कधीही धोका होता कामा नये. मुले शाळेत जाऊ शकतील आणि सुरक्षित वातावरणात शिकू शकतील यासाठी युनिसेफ देशभरातील राष्ट्रीय अधिकारी आणि भागीदारांसोबत काम करत राहील.
दरम्यान, पश्चिम आफ्रिकेतील नायजरमधील शाळांमध्ये तात्पुरत्या वर्गखोल्या म्हणून झोपड्यांचा वापर केला जातो. एप्रिलमध्ये नायजरची राजधानी नियामीयात प्राथमिक शाळेत जोरदार वाऱ्यामुळे लागलेल्या आगीत 20 मुलांचा मृत्यू झाला होता. तसेच या भागात दहशतवादी हल्लेही होत असतात. ऑगस्टमध्ये दक्षिण-पश्चिम नायजरमधील एका गावात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 14 मुलांसह 37 नागरिकांचा मृत्यू झाला होता. या वर्षातच या भागात दहशतवाद्यांनी शेकडो नागरिकांची हत्या केली आहे.