मुंबई – निर्देशांक उच्च पातळीवर असल्यामुळे आणि जागतिक बाजारातून नकारात्मक संकेत आल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात खरेदी-विक्रीच्या लाटा आल्या. दिवसाखेर शेअर बाजार निर्देशांकात मापक घट नोंदली गेली.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 112 अंकांनी कमी होऊन 60,433 अंकांवर बंद झाला. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 24 अंकांनी म्हणजे 0.13 टक्क्यांनी कमी होऊन 18,044 अंकावर बंद झाला.
तरीही सेन्सेक्स 60,000 अंकावर आणि निफ्टी 18,000 अंकावर कायम असल्याबद्दल गुंतवणूकदारांनी समाधान व्यक्त केले. दुपारच्या सत्रात एचडीएफसी बॅंक, कोटक बॅंक, बजाज फायनान्स या बड्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाल्यामुळे निर्देशांकाना आधार मिळाला नाही.
मात्र अशा परिस्थितीतही महिंद्रा, स्टेट बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या शेअरच्या भावात थोडीफार वाढ झाल्यामुळे निर्देशांकाची मोठी आणि टळली असे जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
अमेरिकेमध्ये पायाभूत सुविधांना चालना देणारे एक लाख कोटी डॉलरपेक्षा जास्त तरतुदीचे विधेयक मंजूर झाले असले तरी जागतिक बाजारात गुंतवणूकदार सावध होते. अमेरिकेच्या महागाईची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर जागतिक बाजारांना दिशा मिळू शकेल असे समजले जाते. धातु, वित्त, ग्राहक वस्तू, बॅंकिंग क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची विक्री झाली तर भांडवली वस्तू, तेल आणि नैसर्गिक वायू या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी झाली.
नफादायक कंपन्यांचे शेअर वधारले
महिंद्रा या कंपनीने नफा वाढल्याचा ताळेबंद जाहीर केल्यानंतर या कंपनीच्या शेअरच्या भावात भक्कम वाढ नोंदली गेली. शोभा या रिऍल्टी क्षेत्रातील कंपनीचा नफा वाढल्यानंतर आज या कंपनीचा शेअरचा भाव एक वेळ 11 टक्क्यापर्यंत वाढला होता. दुसऱ्या तिमाहीत या कंपनीचा नफा तीन पटीने वाढवून 48 कोटी रुपये इतका झाला असल्याचे कंपनीने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे.