पुणे – वैद्यकीय व आयुष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सर्व महाविद्यालयांना नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाची प्रवेशप्रक्रिया
लवकर सुरू होण्याची चिन्हे आहेत. मात्र, अभियांत्रिकीसह अन्य अभ्यासक्रमांची प्रवेशप्रक्रिया सुरू झाले आहेत. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी विद्यार्थी-पालकांतून होत आहे.
देशात आणि राज्यात एमबीबीएस, बीएचएमएस, बीएएमएस अशा वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश हे “नीट’च्या गुणांनुसार होतात. “नीट’चा निकाल मागील आठवड्यात जाहीर झाला. त्यामुळे या कालावधीत वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणे गरजेचे होते.
मात्र, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांनी राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला अजूनही सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला तातडीने सुरुवात करावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, याबाबत राज्य सीईटी सेलने नुकतेच परिपत्रक प्रसिद्ध करीत वैद्यकीय महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे. महाविद्यालयांनी त्यांची माहिती, प्रवेशक्षमता,
मान्यता पत्रे आदींची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदणीच्या लिंकद्वारे भरावी. ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण केल्यास, प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करता येईल, असे परिपत्रकात नमूद करण्यात आले.