पुणे – स्पोर्टसफील्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या इंद्राणी बालन विंटर टी-20 लीग अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत पुनित बालन ग्रुप संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. व्हिज्डम् क्रिकेट अकादमी संघाने स्पर्धेत विजयी सलामी दिली.
पहिल्या सामन्यात व्हिज्डम् क्रिकेट अकादमीने शिरूर जिमखाना क्लबचा 114 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजी करताना व्हिज्डम् अकादमीने 18 षटकांत 6 गडी गमावून 178 धावांचे आव्हान उभे केले. या आव्हानाला उत्तर देताना शिरूर जिमखाना क्लबचा डाव 18 षटकांत 64 धावांवर गुंडाळला गेला व व्हिज्डम् संघाने विजयी सलामी दिली.
पुनित बालन यांच्या अष्टपैलू खेळीमुळे पुनित बालन ग्रुप संघाने शिरूर जिमखाना क्लबचा 168 धावांनी पराभव करून स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. पुनित बालन ग्रुप संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 19 षटकांत 2 गडी गमावून 207 धावांचा डोंगर उभा केला. यामध्ये आतिश कुंभार (नाबाद 78 धावा), मेहुल पटेल (नाबाद 46 धावा), पुनित बालन (37 धावा), ओंकार खाटपे (29 धावा) यांच्या फलंदाजीमुळे 200 धावांचा टप्पा पार केला.
या आव्हानाचा पाठलाग करताना शिरूर जिमखाना क्लबचा डाव 12 षटकांत 39 धावांवर गुंडाळला गेला. गोलंदाजीमध्ये पुनित बालन (3-11), धीरज मंत्री (2-5) आणि आतिश कुंभार (2-1) यांनी अचूक आणि चमकदार गोलंदाजी करून पुनित बालन संघाचा विजय सोपा केला.
संक्षिप्त धावफलक
1) व्हिज्डम् क्रिकेट अकादमी ः 18 षटकांत 6 बाद 178 धावा. (प्रतीक खांडवे 60, श्रीकांत सोमवंशी नाबाद 34, श्रीपाद निंबाळकर 25, सॅम बी. 2-29). वि. वि. शिरूर जिमखाना क्लब ः 18 षटकांत सर्वबाद 64 धावा. (सॅम बी. 25, चेतन कुरांदळे 11, विवेक आंची 3-2, प्रथमेश राठोड 2-6). सामनावीर ः प्रतीक खांडवे.
2) पुनित बालन ग्रुप ः 19 षटकांत 2 बाद 207 धावा. (आतिश कुंभार नाबाद 78, मेहुल पटेल नाबाद 46, पुनित बालन 37, ओंकार खाटपे 29). वि. वि. शिरूर जिमखाना क्लब ः 12 षटकांत सर्वबाद 39 धावा. (दियान कोठारी 12, पुनित बालन 3-11, धीरज मंत्री 2-5, आतिश कुंभार 2-1). सामनावीर ः पुनित बालन.