पुणे – ससूनच्या डॉक्टरांनी तीन दिवसांच्या नवजात शिशूवर यशस्वी शस्त्रक्रिया करून ओटीपोटाजवळील 550 ग्रॅम वजनाची गाठ काढली.
सुषमा आकाश प्रकाशे यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी ससूनमध्ये एका मुलाला जन्म दिला. बाळाची पुरेशी वाढ झाल्यानंतर बाळाला पोटात ट्यूमर असल्याचे निदान झाले. त्यामुळे ऍबॉर्शन करता येणार नव्हते. गर्भधारणेचे दिवस पूर्ण भरल्यानंतर त्यांची डॉ. शिल्पा नाईक यांच्या देखरेखीखाली नॉर्मल प्रसूती झाली. बाळाचे वजन त्यावेळी साडेतीन किलो होते.
त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजे 16 ऑक्टोबर रोजी बालरोग शल्यचिकित्सकांनी त्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याच्या ओटीपोटातील ट्यूमर काढला. या बाळाला ओटीपोटात दुखत होते, तसेच उच्च रक्तदाब आणि श्वसनाचा त्रास होत होता. 10.6 सेमी-बाय 7.2 सेमी.-बाय 11.5 सेमी आकाराची मोठी गाठ त्याच्या ओटीपोटात डाव्या बाजूला होती. त्यामुळे त्याच्या मूत्रपिंडाच्या चलनवलनावर परिणाम होत होता. या गाठीचे वजन सुमारे 550 ग्रॅम होते. या शस्त्रक्रियेनंतर बाळाला जीवदान मिळाले, तसेच त्याची प्रकृती स्थिर आहे.
विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी नलबळे भोसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही शस्त्रक्रिया केली. डॉ. रुपेश सिकची आणि डॉ. नैना रामचंदानी यांच्यासह सुरेखा शिंदे, भूलतज्ज्ञ डॉ. सुनीता खेडकर आणि टीमने बाळाला भूल दिली. कर्मचारी परिचारिका उज्ज्वला गरूड आणि स्वाती डोईफोडे यांनी डॉक्टरांना मदत केली. आमच्या टीमचा आम्हांला अभिमान आहे, अशा शब्दांत ससूनचे अधीष्ठाता डॉ. विनायक काळे यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले. कावीळ होऊ नये म्हणून त्याची काळजी घेण्यात आली आहे. बाळाची तब्येत सध्या बरी असून, रक्तदाब स्थिर झाला आहे. त्याची जखम बरी झाली आहे आणि बाळाला डिस्चार्ज मिळणार आहे. बाळाला जीवदान दिल्याबद्दल पालकांनी ससून रुग्णालयाचे आभार मानले. या मातेची या आधी विविध कारणांनी तीन बाळे दगावली आहेत.