पुणे – गुरुवारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन या तिन्ही स्थानकांच्या आगारातील एसटी उभ्याच होत्या. केवळ अन्य विभागांतून पुणे विभागात बुधवारी मुक्कामी आलेल्या बसेस गुरुवारी सकाळी सुटल्या.
पुणे विभागात मुक्कामी गेलेल्या बसेस गुरुवारी आगारात दाखल झाल्या. त्यानंतर संचलन ठप्प होते. याशिवाय आंतरराज्य मार्गांवरील बसेसदेखील रद्द झाल्या होत्या. पुणे विभागातील बारामती आगारातील 27 बसेस सुटल्या. तर दौंड आगारातून 9 बसेस सुटल्या.
संपामुळे बहुतांश बसेस रद्द झाल्या. सुमारे 2 लाख किलोमीटरचे संचलन रद्द झाले होते.
दरम्यान, दिवसभरात केवळ बारामती आणि दौंड आगारातून बसेस सुटल्या. आता तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना तिकिटांचे पैसे परत मिळतील, अशी माहिती पुणे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली.